गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. संभाजीनगर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली असून यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आपत्तीमुळे पिकांबरोबरच पशुधनाचीही हानी झाली आहे, ज्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.
पंचनामे करण्याचे आदेश
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकार मराठवाड्यातील पूरस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे. विदर्भातील यवतमाळ, मराठवाड्यातील परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये गेल्या 48 तासात मुसळधार पाऊस झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस, तूर, सोयाबीन या प्रमुख पिकांना सर्वाधिक फटका बसल्याचे निदर्शनात आले आहे.
मदतीची कार्यवाही त्वरित करण्याची सूचना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय प्रणालीला पंचनामे त्वरित करण्याचे आणि मदतीची कार्यवाही युद्धपातळीवर करण्याचे निर्देश दिले आहेत. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाल्यामुळे, या भागातील नुकसानाचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांना त्वरित मदत
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानाचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिल्या आहेत. pic.twitter.com/M6H14oTnSf
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 3, 2024
पिकांचे नुकसान, घरांची पडझड, आणि पशुधनाची हानी याबाबत त्वरित पंचनामे करण्यात येणार असून अतिवृष्टीमुळे तात्पुरते स्थलांतर केलेल्या लोकांना सर्व आवश्यक सुविधा देण्यात येतील, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान लवकरात लवकर भरून निघावे यासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.