राज्यात पावसाळा सुरू असून उजनी धरणाविषयी महत्त्वपूर्ण अपडेट्स समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची रिपरीप सुरू असून काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस नोंदवला जात आहे. सोलापूर जिल्ह्यात सरासरी 1.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आजपर्यंत 409.1 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. उजनी धरण परिसरातही 7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जूनपासून आतापर्यंत एकूण 391 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
उजनी धरणात पाण्याची आवक घटली
दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. काल सकाळी 11,000 क्युसेक असलेली आवक आज सकाळी 8,746 क्युसेक एवढी कमी झाली आहे. सध्या उजनी धरणात 119.26 TMC पाणीसाठा असून त्यातील 55.60 TMC उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणाची पाणी पातळी 103.80% झाली आहे.
भीमा नदीतील पाण्याचा विसर्ग कमी
काल उजनी धरणातून भीमा नदीत 20,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत होता. मात्र, काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून हा विसर्ग 15,000 क्युसेक एवढा करण्यात आला आहे. उजनी धरणातून सिनावाडा डाव्या कालव्यामध्ये 210 क्युसेक, दहिगाव उपसा सिंचन योजनेत 80 क्युसेक, मुख्य कालव्यात 1,600 क्युसेक आणि बोगद्यात 200 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. ऊर्जा निर्मितीसाठी 1,600 क्युसेक पाण्याचा उपयोग केला जात असून भीमा नदीत 15,000 क्युसेक पाणी सोडले जात आहे. एकूण 16,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग उजनी धरणातून होत आहे.
पावसाचा अंदाज: सहा तारखेपर्यंत पावसाची रिपरिप कायम
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, माढा, उत्तर सोलापूर आणि माळशिरस या तालुक्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. काही ठिकाणी तुरळक, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ही पावसाची रिपरिप 6 तारखेपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन शेतीचं नियोजन करावं.
शेतकऱ्यांना आवाहन: पावसाचा अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेतीचं नियोजन करणे गरजेचे आहे, कारण पावसामुळे शेतीचे नुकसान टाळता येईल.