गेल्या अनेक दिवसांपासून सोयाबीन बाजार भाव अस्थिर असून, यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सध्या सोयाबीनला किती बाजार भाव मिळतोय, हमीभाव किती आहे, आणि पुढील काळात दर काय राहू शकतो, यावर चर्चा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सोयाबीनचे सध्याचे बाजार भाव
गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना सोयाबीनचे दर चांगले मिळत नसल्याने, बऱ्याच शेतकऱ्यांनी अद्यापही आपले सोयाबीन घरातच साठवून ठेवले आहे. मागील काही आठवड्यांपासून सोयाबीनला फक्त 4000 ते 4500 रुपयांच्या घरात सरासरी दर मिळत आहे. या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याने, शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन विकावे की घरी ठेवावे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी सोयाबीनचा दर 4700 रुपये होता, परंतु आता यात 400 ते 500 रुपयांची घट झाली आहे.
परंतु; केंद्राकडून सोयाबीन पिकासाठी 4892 रुपये हमीभाव निश्चित केला असून तो फक्त कागदावरच आहे का असा प्रश्न सध्या शेतकऱ्याकडून उपस्थित करण्यात येत आहे. किमान 4892 रुपये तरी दर बाजार समितीत मिळतोय का यावर शासनाने विचारपूस तरी केली तरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास शासन हे दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
नवीन सोयाबीनची आवक आणि दराचा अंदाज
नवीन सोयाबीन बाजारात येण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. या नव्या आवकेमुळे सोयाबीन बाजार भाव परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयाबीनला 4200 रुपये दर मिळत असून, येथे फक्त 5 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. सेलू बाजार समितीत 110 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, राज्यातील बाजार समित्यांमध्ये सरासरी दर 4 हजारांच्या दरम्यान पाहायला मिळत आहे.
आंदोलने आणि शेतकऱ्यांची मागणी
सोयाबीनला चांगले दर मिळवण्यासाठी देशात काही ठिकाणी आंदोलन देखील होत आहेत. मध्य प्रदेशात सोयाबीन बाजारभाव कमी मिळत असल्याने तीव्र आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रातही रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली 3 सप्टेंबर रोजी सिंदखेड राजा येथे कापूस आणि सोयाबीनसाठी चांगले दर मिळवण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
बाजार तज्ञांचा अंदाज आणि शेतकऱ्यांचे आव्हान
बाजार तज्ञांच्या मते, सोयाबीन बाजारभाव पुढील काही काळात चढ-उतार राहू शकतो. सध्या सोयाबीन पीक काढणी अवस्थेत येण्यासाठी काही काळ उरला आहे, त्यामुळे काही शेतकरी पैसे अभावी लवकरात लवकर सोयाबीन बाजारात आणतात. यामुळे बाजारभावात आणखी घट होऊ शकते. सध्याचे दर पातळी पाहता, सोयाबीनचे दर फारच कमी असल्याचे दिसत आहे, आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
शेतकऱ्यांनी या स्थितीचा विचार करून आपल्या उत्पन्नाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. बाजारातील बदलत्या स्थितीवर लक्ष ठेवून शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे नियोजन करावे.