राज्य मंत्रिमंडळाच्या 5 सप्टेंबर 2024 रोजी पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, त्यापैकी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनe निकषांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय.
अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांसाठी योजना सुधारणा
राज्यातील अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, ज्यात नवीन विहिरीचे खोदकाम, जुन्या विहिरींची दुरुस्ती, शेततळे, वीज जोडणी, ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि शेततळ्याचे अस्तरीकरण यासारख्या बाबींचा लाभ दिला जातो. या योजनेच्या अटींमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत.
विहिरीच्या खोदकामासाठी 12 मीटर खोलीची अट रद्द
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनाअंतर्गत, नवीन विहिरीच्या खोदकामासाठी 12 मीटर खोलीची अट घालण्यात आली होती, जी आता रद्द करण्यात आली आहे. ही अट अनेक लाभार्थ्यांसाठी अडचणीची ठरत होती.
दोन सिंचन विहिरींमधील 500 फूट अंतराची अट रद्द
या योजनेतील आणखी एक जटिल अट म्हणजे दोन सिंचन विहिरींमधील 500 फूट अंतर राखण्याची अट होती. अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या जमिनीच्या कमी क्षेत्रामुळे ही अट पूर्ण करणे कठीण होत होते, त्यामुळे अनेक लाभार्थी या योजनेतून बाद होत होते. ही अट देखील आता रद्द करण्यात आली आहे.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना महत्त्वपूर्ण सुधारणा: अनुदान वाढवले
राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. योजनेत मिळणाऱ्या अनुदानाच्या मर्यादा वाढवण्यात आल्या असून, शेतकऱ्यांना या योजनेचा अधिक लाभ मिळणार आहे.
नवीन विहिरीसाठी अनुदानात वाढ
या योजनेअंतर्गत नवीन सिंचन विहिरीसाठी दिलं जाणारं अनुदान आता ₹2,50,000 वरून ₹4,00,000 करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिक आर्थिक मदत मिळणार आहे.
जुन्या विहिरींच्या दुरुस्तीचे अनुदान दुप्पट
जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी ₹50,000 दिले जात होते, परंतु आता हे अनुदान ₹1,00,000 करण्यात आले आहे. बोरिंगसाठी अनुदान ₹20,000 वरून ₹40,000 करण्यात आले आहे.
मोटार संच आणि शेततळ्याचे अनुदान वाढवले
मोटार संच किंवा इतर यंत्रसामग्रीसाठी ₹50,000 अनुदान देण्यात येईल, तर परसभागासाठी ₹5,000 अनुदान निश्चित करण्यात आलं आहे. शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी ₹1,00,000 अनुदान देण्याऐवजी ₹2,00,000 किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% पर्यंत अनुदान देण्यात येईल.
तुषार आणि ठिबक सिंचनासाठी अनुदानात वाढ
तुषार सिंचनासाठी ₹25,000 अनुदान देण्यात येत होते, ते आता ₹47,000 किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% पर्यंत वाढवण्यात आले आहे. ठिबक सिंचनासाठी अल्प भूधारक शेतकऱ्यांना ₹96,000 किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% अनुदान देण्यात येणार आहे.
महत्वाच्या अटी रद्द
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतील 12 मीटर खोलीची अट आणि दोन सिंचन विहिरींमधील 500 फुटाचं अंतर या अटी रद्द करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे शेतकरी लाभार्थ्यांना आता या अटींमुळे बाद होण्याची चिंता राहणार नाही.
राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, लवकरच या सुधारित योजनेचा शासन निर्णय (GR) निर्गमित केला जाईल, आणि शेतकऱ्यांना या योजनेचा अधिकाधिक लाभ मिळू शकेल.