राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांसाठी एक आनंददायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर घालण्यात आलेली बंदी अखेर उठवली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
२०२४-२५ हंगामात इथेनॉल निर्मितीला मंजुरी
२०२४-२५च्या नव्या हंगामात साखर कारखान्यांना ऊसाचा रस, सिरप, आणि हेवी मोलॅसेसपासून इथेनॉल निर्मिती करता येणार आहे. या निर्णयामुळे साखर कारखान्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील त्यांच्या उत्पादनासाठी चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे.
साखरेच्या टंचाईमुळे बंदी घालण्यात आली होती
डिसेंबर २०२३ मध्ये साखरेची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन केंद्र सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती. या बंदीमुळे साखर कारखान्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मिळकतीतही घट झाली होती.
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट
केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये १०% इथेनॉल मिश्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, जे २०२५ पर्यंत २०% करण्याचे आहे. त्यामुळे इथेनॉलची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. राज्य सरकारच्या पाठपुराव्यामुळे केंद्राने उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीला मंजुरी दिली आहे.
साखर उत्पादन आणि निर्यातीत अडचणी
गेल्या ५ ते ७ वर्षांमध्ये उसाचे क्षेत्र आणि साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, साखरेच्या निर्यातीवर निर्बंध असल्याने साखरेचा पुरेसा उठाव होत नाही. त्यामुळे साखर कारखान्यांच्या गोडाऊनमध्ये साखरेचा मोठ्या प्रमाणात साठा आहे, ज्यामुळे कारखान्यांना अडचणी येत आहेत.
शेतकऱ्यांना आणि कारखान्यांना फायदा
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. ऊसाचा रस वापरून इथेनॉल निर्मिती सुरू केल्याने कारखान्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा होईल. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि साखर कारखान्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण बातमी ठरली आहे.
इथेनॉल निर्मितीच्या परवानगी मुळे ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा फायदा होणार असून अर्थकारणाला मोठी गती मिळेल..
सहकारी साखर कारखान्यांचे उत्पन्न वाढीसाठी देखील या निर्णयाचा मोठा फायदा होणार असून या उत्कृष्ट निर्णयाबद्दल केंद्र सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद!#इथेनॉल #ethanol #sugar… pic.twitter.com/byQ0bzZvXu
— Malhar Ranajagjitsinha Patil (@patil_malhar) September 1, 2024