आज शनिवार, २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सव्वा सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीबाबत महत्वाची माहिती मिळाली आहे. उजनी धरणात दौंडकडून येणारा पाण्याचा विसर्ग आणि निरा भाटघर धरणातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
वीर धरणातून नीरा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग
वीर धरणामधून नीरा नदीमध्ये आज सकाळी सव्वा अकरा वाजल्यापासून ३३,७५९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. नीरा नदीच्या कालव्यातील मोठ्या पावसामुळे वीर धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे वीर धरणातील पाण्याच्या स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ३०,००० क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. धरण प्रशासनाने सांगितले आहे की, पावसाच्या प्रमाणानुसार या विसर्गात कमी-जास्त वाढ होऊ शकते.
खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग वाढ
खडकवासला धरणातून आज दुपारी तीन वाजल्यापासून ८,७३४ क्युसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदीत होत होता. यामध्ये ४ हजार क्युसेकची वाढ करण्यात आलेली असून आता १२,९५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून मुठा नदीत होतोय. हेच पाणी पुढे भीमा नदीला मिळत असून, दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
धरण प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
उजनी धरणातून भीमा नदीत विसर्गात वाढ; जलसाठ्यात महत्त्वपूर्ण वाढ
उजनी धरण प्रशासनाने आज दुपारी ३:०० वाजल्यापासून भीमा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. उजनी धरणामधून भीमा नदीत ३०,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आत्ताच हाती आलेल्या सव्वा सहा वाजताच्या अपडेटनुसार, उजनी धरणातील एकूण जलसाठा १२०.४७ टीएमसी आहे, ज्यामध्ये ५६.८१ टीएमसी हा उपयुक्त जलसाठा आहे. धरणाची पाण्याची पातळी १०६.०४% झाली आहे.
दौंड आणि अन्य धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू
दौंड येथून उजनी धरणामध्ये ६,३७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. याशिवाय, सीनामाडा डाव्या कालव्यातून १७५ क्युसेक, दहिगा उपसा सिंचन योजनेमध्ये ८० क्युसेक, आणि बोगद्यामधून २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुख्य कालव्यातील विसर्गात थोडीशी घट करण्यात आली असून, आता १,६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये ३१,६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ
उजनी धरणातून ३०,००० क्युसेक आणि वीर धरणातून ३३,७०० क्युसेक पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग होतो आहे. मिळून, जवळपास ६३,००० क्युसेक पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग भीमा नदीमध्ये होत आहे. या विसर्गामुळे भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.